खूप दिवसांपासून एक खतरनाक विचार माझ्या सुपिक डोक्यात घर करून होता...आपण काहीतरी, एकदा तरी मराठीत लिहावं असं खूप खूप मनापासून वाटत होते. पण तसं करायची हिम्मत एकजूट होतंच नव्हती. पण आज म्हटलं काही तरी खरंच लिहून पाहावं...निदान प्रयत्न तरी करावा...नाही जमलं तर द्यावं सोडून..त्याच्यात काय? पण निदान प्रयत्न केल्याचं समाधान आणि सुख तरी अनुभवता येईल.
मराठी हा माझा तसा फार काही आवडीचा विषय वैगरे नाही पण शाळेत दहावी पर्यंत ह्या विषयात सर्वात जास्त मार्क मी कधी सोडले नाहीत. त्यामुळे ह्या भाषेशी एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. पुढे एका मराठी कुटुंबात लग्न होऊन मुंबईला आल्यापासून तर ह्या भाषेचाच आसरा होता. पूर्वी नवीन लग्न झाल्यावर बऱ्याच जणांनी विचारलं की मला एव्हडं मराठी कसं बोलता येतं! पण बऱ्याच जणांना अजूनही माहित नाही की गोव्याला मराठी हा एक विषय असतो आणि बहुतेच कोंकणी बोलणारे सगळेच मराठी पण फार सफाईदार पणे बोलू शकतात.
माझी मराठी काही एकदम कुशल पातळीवरची वैगरे नाही पण तरीही चेतन एव्हडी वर्ष माझ्याशी यशस्वीपणे संवाद साधतोय म्हणजे जरा तरी चांगल्या पातळीवरची असली पाहिजे...नाही का? अजूनही बऱ्याच ठिकाणी बोलताना कोंकणीचा अंश जाणवतो... अजूनही माश्या आल्या म्हणायच्या ऐवजी मूस आले हे अगदी सहजपणे तोंडातून बाहेर पडतं. अजूनही घरातल्या कामवालीला मुग भिजत घाल म्हणताना कुठेतरी फुगत घाल म्हणायचा मोह आवरायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. आणि मग स्वतःवरच चीड येते कि एव्हडी वर्षं झाली तरीही एका भाषेवर आपण प्रभुत्व मिळवू नाही शकलो....पण असो...सगळ्यांनाच सगळंच कुठे जमते, म्हणून तर हे जग चालते....
पण आता जेव्हा मुलांना वेगवेगळ्या भाषा खूपच सहज आणि सफाईदार पणे बोलताना पाहते तेव्हा मात्र खूप समाधान वाटते. इंग्रजी भाषा हि आज-काल काळाची एक गरज झाली आहे त्यामुळे मुलं ही भाषा पटकन शिकतात. त्या व्यतिरिक्त त्यांची शाळा इंग्रजी माध्यमाची असल्यामुळे अजून भर पडते. पण घरी जेव्हा ही पलटण माझ्याशी एकदम शुद्ध कोंकणीत आणि बाकीच्यांशी शुद्ध मराठीत बोलते तेव्हा मात्र खूप गर्व वाटतो ह्या मुलांचा. बंगळूरू मधून जर मुंबईला आलो नसतो तर कदाचित दोघे कन्नड पण सराईत पणे बोलले असते. असं म्हणतात कि माणसाला जेव्ह्ड्या जास्त भाषा येतात तेव्हडा तो माणूस विद्वान. त्यामुळे जेव्ह्ड्या भाषा शिकता येतील तेव्ह्ड्या जरूर शिकाव्यात.
शेवटी मनातली एक इच्छा पूर्ण झाली ह्याचा आनंद आणि अभिमान, दोन्हीही आहे...काहीही झालं तरी मी मरेपर्यंत स्वतःला गोयंकारच म्हणेन पण हा अभिप्राय मराठीतून लिहिताना एक वेगळीच मजा आहे!!! आणि ती मजा मला खूप दिवसांपासून अनुभवायची होती!!
(ह्या लेखनात अजूनही चुका असू शकतात..कृपया तुम्हाला आढळल्यास खाली कमेंट्स मध्ये त्यांची नोंद करायला विसरू नका.)